Tags » वाचन

नवे शब्द शिकताना

धडे-कविता शिकताना नवीन शब्द आला, की मुलं त्या शब्दाचा अर्थ लिहून घेतात आणि पुढे जातात. पण तो शब्द शिकताना जर त्या अनुशंगाने येणारे बाकी शब्द पण शिकता आले तर? म्हणजे ‘परका’ असा शब्द शिकविताना ‘पर’ चा अर्थ आणि त्याबरोबर येणारे परदेश, परकीय, परप्रांत, परभाषा असे बरेच शब्द मुलांना शिकविता येतील. तसंच ‘संग्रहालय’ हा शब्द शिकताना संग्रह आणि आलय हे शब्द समजले आणि आलय म्हणजे घर असं लक्षात आलं, की त्याबरोबरच वाचनालय, रुग्णालय हे शब्द पण शिकून होतील. हिमालयाच्या नावातलं सौंदर्य समजेल. पुढे कधी ‘दुग्धालय’ असा शब्द वाचनात आला, तर स्वत:चा स्वत: अर्थ लावता येईल. यातून नुसतीच शब्दसंपत्ती वाढणार नाही, तर शब्द कुठून आले, कसे तयार झाले, यातली गंमत अनुभवता येईल. आपोआप गोडी वाटेल.

मात्र अभ्यासक्रम पूर्ण करायच्या वेळापत्रकात असं सगळं शिकवायला, गोडी लावायला आपल्याकडे अवधी आहे का? आणि हे परीक्षेत येत नाही, तर शिकण्या-शिकविण्याची गरज भासणार आहे का?

Marathi

कोणतं कौशल्य शिकायचं?

भाषेच्या पाठ्यपुस्तकात वेगवेगळे धडे आणि कविता असतात आणि मुलं वर्गात हे धडे, कविता शिक्षकांकडून शिकतात. यातून मुलांनी नक्की काय शिकणं अपेक्षित आहे? फक्त पुस्तकातले धडे माहीत करून घेणं अपेक्षित आहे का? की त्या धड्यांसारखे, त्या पातळीचे कोणतेही लेख, गोष्टी, कविता समजून घेण्याचं कौशल्य शिकणं अपेक्षित आहे?

आपली सध्याची पद्धत अशी आहे, की या धड्या-कवितांवरची प्रश्नोत्तरे मुलं गृहपाठ म्हणून सोडवितात किंवा शिक्षक उत्तरं सांगतात आणि मुलं वर्गात ती लिहून घेतात. यातलेच काही प्रश्न परीक्षेत येतात. सगळी नसली, तरी बरीचशी मुलं ही उत्तरं पाठ करून, घोकून परीक्षेत लिहितात. या सगळ्या पद्धतीत मुलांना धड्यांचं किती आकलन झालं आहे, हे कळायला मार्ग नसतो आणि समजा, हे धडे वर्गात शिकविलेले असल्यामुळे समजले आहेत, असं जरी गृहीत धरलं तरी याच प्रकारचं इतर लेखन त्यांना स्वत:चं स्वत: समजून घेण्याचं कौशल्य आत्मसात झालं आहे का, हे कसं कळणार?

बऱ्याचशा प्रगत देशांमधे प्राथमिक शाळांपासून भाषेसाठी पाठ्यपुस्तकच नसतं. नेमून दिलेले धडे शिकणं हा उद्देश नसून, नेमून दिलेल्या विशिष्ट काठिण्य पातळीचा (कोणताही) मजकूर समजून घेण्याची क्षमता शिकणं हा उद्देश असतो. उदा. – इंग्लंडमधे भाषा विषयासाठी प्राथमिक शाळेपासूनच पाठ्यपुस्तक नसतं. वयानुरूप, इयत्तेनुसार विशिष्ट पातळीचे लेख, गोष्टी, कविता, पुस्तके ही वाचली जातात आणि त्यावर वर्गात चर्चा होते. गृहपाठ म्हणून किंवा परीक्षेत पूर्वी न वाचलेला मजकूर समजून घायचा असतो. त्यामुळे वाचलेल्या गोष्टीचे आकलन तपासले जाते. वहीतली किंवा गाईडमधली उत्तरं नीट पाठ केली आहेत का, हे तपासलं जात नाही.

आपल्याकडेही पाठ्यपुस्तक काढून टाकायला पाहिजे, असं म्हणण्याचा हेतू नाही. पाठ्यपुस्तक तयार करताना काही विचार केलेला असतो. विषयांचं आणि शैलीचं वैविध्य, सखोलता वगैरे आणण्याचा त्यात प्रयत्न असतो. पण परीक्षा पाठ्यपुस्तकातील धड्यांवर कशाला हवी? परीक्षेत पाठ्यपुस्तकाच्या पातळीच्या पाठ्येतर मजकुराचं आकलन तपासलं, म्हणजे झालं.

Marathi

खिडक्या अर्ध्या उघड्या

‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ ही गणेश मतकरी यांची कादंबरी नुकतीच वाचून पूर्ण केली. ‘संपवली’ हे क्रियापद काही कादंबर्‍यांबाबत वापरता येत नाही, ‘फडशा पाडणे’ हे तर लांबचे; हे क्वचितच घडतं, त्यामुळे ‘पूर्ण केली’ या शेवटाचं अप्रुप.
यातले तीन तुकडे मी पूर्वी वाचले होते, ते अनुभव या मासिकात प्रकाशित झाले होते तेव्हाच. त्यावेळी त्या सुट्या तुकड्यांचं इम्प्रेशनदेखील खूप चांगलं होतं. तेवढ्यात दोन गोष्टी आवडल्या होत्या, त्यातली एक म्हणजे ‘आर्किटेक्ट’ लोकांचं जगणं-वागणं-विचार करणं हे मराठीसाठी नवं क्षेत्र असल्याने त्या विषयातलं कुतूहल भागवणारं बरंच काही त्यात दिसेल असा अंदाज बांधता येणारी झलक त्या तुकड्यांमधून मिळाली होती. त्यात वेगवेगळे निवेदक होते आणि त्यातला एक अगदी कुमारवयीन मुलगा होता. आजच्या पिढीतल्या मुलाचं भावविश्व, तेही मराठी वाचकाला काहीशा दुराव्याच्या, अनोळखी – म्हणून किंचित तिरस्कार वाटणार्‍या आर्थिक स्तरातल्या मुलाचं चित्रण मला आकर्षक वाटलं होतं. एक कार्यक्षेत्र घेऊन तेच ‘विषय’ बनवून त्यातली माणसं सोंगट्यांसारखी खेळवणं, त्यातल्याच घडामोडींचा एक खेळ तमाम डावपेचांसह रंगवणं निश्चितच इंटरेस्टींग होतं आणि लेखक म्हणून आव्हानास्पदही. हे आव्हान गणेश कसं पेलवतोय, याचं कुतूहल मनात होतंच.
पूर्वी मासिकांमध्ये क्रमशः छापल्या जाणार्‍या ‘धारावाहिक’ कादंबर्‍या असत. सैल मनोरंजन असे. ती जागा पुढे टीव्हीवरच्या मालिकांनी घेतली. ‘पुढे काय होणार याची उत्सुकता टिकवून ठेवणे’ हे त्या रचनेतलं मुख्य कौशल्य असे. नंतरच्या काळात मासिकांची स्वरूपं बदलत गेली आणि लेखनाचीही. त्यामुळे मालिका पद्धतीनं येणारी ही कादंबरी जुन्या धारावाहिकांप्रमाणे नसणार हे जाहीर होतं आणि त्यात वेगळं काय असणार आहे, याचं कुतूहलही होतं. यात एकूण १० तुकडे आहेत आणि त्यातले शेवटचा एक वगळता बाकी ९ हे स्वतंत्रपणे एखादी कथा म्हणूनही वाचता येतील असे आहेत, हे यातलं वेगळेपण आहे, हे आता सलग पुस्तक वाचताना जाणवलं.
मला या कादंबरीतलं मुख्य बलस्थान जाणवलं, ते तिच्या वर्तमानात राहण्यात! इतकी वर्तमानात राहणारी कोणतीही लहान व मोठी कादंबरी मी आजवर वाचलेली नाहीये. म्हणजे अगदी शेवटच्या तुकड्यात काळ दोन वर्षांनी पुढे सरकला आहे हे जाणवतं आणि भूतकाळातल्या आठवणींचे अगदी लहान अंश त्यात येतात. तरीही आपण जिथं उभे आहोत तिथून अजिबातच इतरत्र सरकत नाही. हे सगळं ‘आत्ता, या क्षणी’ घडतं आहे आणि घडतानाच ते त्यात घटितात सहभागी असलेल्यांपैकी कुणीतरी एक आपल्याला सांगतं आहे, असं वाटत राहतं. भूतकाळाचे संदर्भ जितके फिजूल वाटतात, तितकाच भविष्याचा फार जास्त पल्ल्याचा विचार करत बसणंदेखील नव्या पिढीला फिजूलच वाटतं. हा फिजूलपणा त्यांना वर्तमानात पूर्णांशाने व नीटपणे जगू देतो, त्यांना ‘आज’ निखळपणे उपभोगू देतो. हे बदलत्या काळातलं विलक्षण असं काळाचं भान गणेशने अत्यंत प्रभावीपणे टिपलेलं आहे.
वर्तमानात असण्यासोबतच ‘समकालीन’ असणंही जोडून आलेलं आहे. ‘समकाल’ ही आपल्या देशात, देशातल्या कोणत्याही भाषेत ‘एक निश्चित’ अशी गोष्ट नाहीये. एकाच काळात आपण अनेक काळ जगत असतो. प्रत्येक शहर, गाव, महानगर, खेडी, आदिवासी वस्त्या सगळं वेगवेगळ्या काळांमध्ये आपल्याला नेत राहतं. त्या त्या काळाचे फायदे-तोटे सर्वत्र दिसत असतात. त्यामुळे अनेक काळ जगणार्‍या देशातल्या महानगरामधला समकाल नोंदवणं, ही सोपी गोष्ट निश्चितच नव्हे. सुरुवातीचा साधारण अर्धा भाग वाचताना आपल्याला उच्चतेकडे झुकणारा उच्च मध्यम वर्गच प्रामुख्याने दिसत राहतो. अशी चित्रणं येतात तेव्हा अशा घरांमधल्या कामकरी वर्गाच्या ( मोलकरीण, वॉचमन, ड्रायव्हर इ. ) चित्रणाने त्यात थोडा कॉन्ट्रास्ट आणण्याचा प्रयत्न अनेक लेखक करतात. आर्थिक संपन्नतेचं चित्रण करताना येणार्‍या काहीशा अपराधभावातून हे होत असावं. कारण या वर्गातले लेखक मराठीत जवळपास नाहीतच. त्यामुळे चित्रणात काल्पनिकता तरी असते किंवा काहीसा उपरेपणा तरी असतो. आपल्या शिक्षणाचा व कामाच्या निमित्ताने हा वर्ग जवळून पाहिलेला असल्याने गणेशला हे दोष सहज टाळता आलेले आहेत. एकाच वर्गाचं चित्रण करण्याचा एकसूरीपणा त्याने एन.जी.ओ.मध्ये काम करणार्‍या व्यक्तींचं आणि त्यांच्या निमित्तानं झोपडपट्टीचंही दर्शन घडवून टाळलेला आहे… जो कादंबरीच्या नाट्यालाही पूरक ठरतो आणि त्याचा गडदपणा या चित्रात खोली आणणारादेखील ठरतो. फक्त हा नेमका भाग काहीसा आटोपशीर केलेला, अगदी उरकला आहे असा वाटायला लावणारादेखील ठरतो. दहा तुकड्यांमध्ये लेखन पूर्ण करायचं हे मनाशी नकळत ठरवलेलं गणित आणि मासिकामध्ये छापण्याचा मजकूर कमी शब्दसंख्येचा असावा याचंही नकळत असलेलं दडपण हे याचं कारण असावं. त्यामुळे त्यावेळी असं घडलं असलं तरी नंतर पुस्तक छापायचं आहे म्हटल्यावर या काही तुकड्यांचं पुनर्लेखन करणं आवश्यक होतं. मात्र ज्या मासिकाने हा मजकूर छापला, त्यांनीच ते प्रकाशित केलेलं असल्याने त्यावर ‘पुस्तकाच्या संपादकां’नी काही काम केलं की नाही माहीत नाही; मुळात तिथं असे वेगळे संपादक आहेत की नाही, याचीही काही कल्पना नाही. हा संशय येण्याचं अजून एक कारण आहे, जे शेवटी मांडणार आहेच.
या कादंबरीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लेखकाचं लिंगातीत आणि वयातीत असणं. एक लेखक म्हणून त्याबाबत गणेशचा कुणाही लेखकाला स्वाभाविक हेवा वाटावा. सानिका, जोशीकाकू, नीता अशी पात्रं रंगवताना कुठंही तो स्त्री नाही, असं जाणवत नाही आणि पुरुषपात्रांमध्येही ‘खास पुरुषी’ असण्याच्या क्षमता व मर्यादा पुरुष लेखकांमध्ये जाणवत राहतात लेखनात अस्तरासारख्या… त्याही इथं जाणवत नाहीत. तेच वयाबाबतही म्हणता येईल. १२-१३ वयाच्या मुलाचं पात्र रंगवणं एकवेळ ते सारं भूतकाळात अनुभवलेलं असल्याने सोपं असतं म्हणावं, तर वृद्ध जोशीकाकूंनाही तो त्याच ताकदीनं रंगवतो.
त्यात कुठंही हळवा, भावव्याकूळ, सणकी, काव्यात्म टोन प्रसंगात वा भाषेतही दिसत नाही; उलट एक चांगली विचारी संवेदनशीलता दिसते, जी प्रगल्भतेचं लक्षण मानता येईल.
मुंबईच्या दर्शनामुळे ही कादंबरी वाचताना थोडीबहुत अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ व ‘झिपर्‍या’ची आठवण झाली, तरी पत्रकाराच्या नजरेची मर्यादा ‘खिडक्या अर्ध्या उघड्या…’ला नाही; त्यामुळे साधूंशी तुलना करावीशी वाटली, तरी हे लेखन साधूंच्या लेखनाहून अनेक तर्‍हांनी निश्चितच निराळं आहे.
गणेश फार तपशीलांमध्ये शिरत नाही, ही काहीशी उणीव वाटते. कादंबरीसारख्या फॉर्ममध्ये तपशीलांना जागा असतेच आणि जे थोडके तपशील त्यानं टिपले आहेत, त्यावरून पुढच्या काळात हे त्याचं सामर्थ्यस्थान ठरू शकतं.
आता हा कथासंग्रह की ही कादंबरी, यावर मतभिन्नता आहे. पण ‘अनेक केंद्रं असणं’ हे कादंबरीचं साधंसोपं वैशिष्ट्य मानलं, तर ही कादंबरीच आहे असं ठामपणे म्हणता येईल. ‘जोडलेले तुकडे’ अशी याची रचना अजिबात वाटत नाही. शीर्षकातलं खिडक्यांचं प्रतीक त्यासाठी समर्पक आहे. जोडलेल्या असतात त्या भिंती आणि खिडक्या असतात त्या त्या भिंतींमध्ये, इतका साधा विचार करून ते दृश्य डोळ्यांसमोर आणलं तरी हे कळून जातं. अंधारात भिंती दिसत नाहीत आणि प्रकाशित असलेल्या खिडक्या तेवढ्या दिसत राहतात इतकं हे साधं गणित आहे. खिडक्यांमधून दिसलं तेवढंच पाहायचं म्हटल्यावर लेखक वाचकाला स्पूनफिडिंग करणार नाही, हे स्पष्ट होतं आणि मधल्या जागा वाचकानं आपल्या कल्पनाशक्तीनं भरून काढाव्यात असंही सूचित केलं जातं.
तरीही खिडक्यांमधून जे दाखवलं गेलं आहे, ते उत्तरार्धात जास्तच गतिमान होतं आणि वाहनातून जाताना एखाद्या खिडकीतलं दृश्य काही क्षण दिसावं आणि ते अपुरं पाहिल्याची चुटपूट लागावी तसं होतं. ही गती पूर्वाधाच्या गतीहून निराळी असल्याने खटकते. आधीपासूनच तो वेग असता तर हे जाणवलं नसतं.

०००
आशयाबाबत लिहावं इतका महत्त्वाचा तो आहेच. पण इथं मी परीक्षण नव्हे, तर प्रतिक्रिया म्हणून लिहायला बसले आणि तीच इतकी लांबत गेली. तर हा भाग मी राखून ठेवते आणि पुन्हा वेळेची सवलत मिळताच इथं येऊन तेही लिहिते. क्वचितच एखाद्या पुस्तकाविषयी इतकं भरभरून लिहावं असं वाटतं. आणि ब्लॉगवर लिहीत असल्याने ही सवलत घेऊ शकते आहे.

०००
आता एक मुख्य दोष शेवटाकडे सांगते. तो लेखकाचा नसून प्रकाशकांचा आहे.
या पुस्तकाची निर्मिती ही बी ग्रेडची आहे. पुस्तक या दृष्टीनं मासिकातल्या मजकुराचं संपादन झालं नाही, हा एक मुद्दा आहेच, पण बाह्यरूपही निकृष्ट आहे. मुखपृष्ठ तुलनेत बरं आहे, पण पुस्तक उघडून मांडणी पाहताच मी वैतागले. त्याची कारणं अशी :
१. मजकुराची अलायमेंट ‘जस्टीफाय’ हवी होती, लेफ्ट नको. त्यामुळे मजकूर एका बाजूने झिगझॅग दिसत राहतो आणि दोन वा तीन कॉलमी मासिकात ते खपून गेलं, तरी पुस्तकात अत्यंत वाईट दिसतं.
२. प्रत्येक परिच्छेदानंतर जी स्पेस टाकलेली आहे, ती जरा जास्तच आहे. मुळात पुस्तकात अशा स्पेसची गरजच नसते. ती सतत लय मोडते. जिथं काही परिच्छेदांनंतर ‘एका ओळी’चं अंतर पुस्तकात टाकलं जातं ते या अंतरामुळे पावणेदोन ओळींचं बनतं.
३. नवा निवेदन सुरू होतो त्याच्या आधीची बुलेट पहिल्या कथेत पहिल्यांदा येते ती पानाच्या शेवटी, कोपर्‍यात. ती बुलेट चांगली आहे, पण चुकीच्या जागी प्लेस केल्यानं दिसतच नाही. आणि एकदम नवा निवेदन असल्याचं काही ओळी वाचल्यावर ध्यानात येऊन दचकायला होतं. मी हा मजकूर आधी वाचलेला होता, म्हणून फार चरफडले नाही, पण इतर वाचकांना पुन्हा मागे जाऊन वळून पाहावे लागत असणार. पुढील प्रकरणांच्या शेवटीही ही बुलेट वापरली आहे. ते मुळात एक रिडक्शन केलेलं इलस्ट्रेशन आहे आणि इलस्ट्रेशन बुलेट म्हणून वापरायचं असतं, तेव्हा ते एकरेषीय असेल तरच इतक्या रिडक्शनमुळे दिसतं किंवा बरं दिसू शकतं. ( असं एक सुरेख रेखाटन ‘राहीच्या स्वप्नाची गोष्ट’ या भारत सासणे यांच्या कादंबरीत फार समर्थपणे वापरलं गेलं आहे. संदर्भ म्हणून ते जरूर पाहावं.)
४. एक रेखाटन ( !) कादंबरीत दोनदा वापरलं आहे, ते मासिकातही सुमार वाटावं असं आहे, पुस्तकात ते असणं तर चिडचिड करायला लावतं. ते जिथं दुसर्‍यांदा वापरलं आहे, तिथला उजव्या पानावरचा मजकूर वाचताना ते इतकं डिस्टर्ब करत होतं की अखेर तिथं एक पांढरा कोरा कागद ठेवून मी पुढचा भाग वाचला. इतका बालीशपणा एखाद्या गंभीर कादंबरीबाबत करणं योग्य आहे का?
हे सगळं का झालं असावं, याचा थोडा विचार मी करून पाहिला.
प्रकाश आमटे यांच्या आत्मचरित्राबाबतही अशा गोष्टी खटकल्या होत्या. मग मी समकालीन प्रकाशनाची इतर पुस्तकंही घरात होती, ती काढून पाहिली. तेव्हा जाणवलं की साप्ताहिकं / मासिकं छापणारी लोक पुस्तकं छापायला लागतात, तेव्हा असे गोंधळ हमखास होतात. मजकुरावरही त्याचा विपरित परिणाम होतो, तर मग मांडणीचं काय? पुस्तकांची कामं बघणारी संपादक विभागातली माणसं तरी त्यांनी मासिकवाली, टिपिकल जर्नॅलिझम केलेली घेऊ नयेत… ती निराळीच हवीत. त्याचप्रमाणे चित्रकारही मासिकं, वृत्तपत्रं यांच्या मांडणीच्या चौकटीत अडकलेले नकोत. तो प्रभाव पुस्तकांवर कळत-नकळत पडतोच आणि दर्जा उणावतो. समकालीनचे विषय चांगले असतात, पण या गोष्टींमुळे पुस्तकांचा दर्जा आशय व निर्मिती या दोन्हीबाबत काहीसा घसरतो, कमकुवत होतो.

वाचन